आज मित्रांशी बोलताना शाळेचा उल्लेख निघाला. माझी शाळा हा माझ्यासाठी एक अत्यंत अप्रिय असा प्रवास आहे (त्यावर लेख कधीतरी नंतर.) पण मी माझ्या मित्रांना सांगत होतो कि माझ्या शालेय जीवनाच्या १२ वर्षात असा एकही तास नाही जो मला आयुष्यभर स्मरणात राहिल.
मी त्यांना माझा चाणक्य मंडल परिवार मधील अनुभव सांगितला – झालेल्या तासांपैकी किमान (मी किमान म्हणतोय), किमान ८० टक्के तास मला काल झाल्यासारखे लक्षात आहेत. इतके जीव तोडून शिकवणारे शिक्षक असतात हे मला चाणक्य मधे आल्यावर जाणवलं. स्वरूप दादा, भूषण सर, विजय गुप्ता सर, अमोल सर, सागर शहा सर, स्वप्नील दादा, कौस्तुभ मोने सर आणि ofcourse धर्माधिकारी सर स्वतः हि म्हणजे चाणक्य ची २००३ world cup मधली line up टीम आहे.
मी माझ्या आयुष्यातला चाणक्य मधला सगळ्यात बेस्ट तास सांगतो – ‘बहर’ नावाचं खडकवासला धरणाच्या काठावर शिबीर होतं, आणि रोज एक तास सरांचा ठरलेला असे. त्या दिवशी वातावरण थोडं ढगाळ होतं, सर एका विषयावर बोलत होते आणि अचानक पाऊस सुरु झाला. सरांनी बोलणं थांबवलं आणि आम्हाला डायरेक्ट विचारलं “तास इथे थांबवून भिजायला जायचं का?” आम्ही सगळे गार. परत, सरांनी प्रश्न विचारला कि उत्तर द्यायचं हे तत्व माहित असल्याने अर्ध्या लोकांनी हो आणि काही लोकांनी नाही असं सांगितलं. पण काही कारणास्तव तो plan cancel झाला आणि सर परत विषयावर बोलायला लागले. पाऊसाने जोर धरला होता आणि बोलता बोलता सरांनी ‘शतकांचा यज्ञातून उठली’ या गाण्याचा संदर्भ दिला. त्यावर कोणीतरी हात वर केला ( चाणक्य मधली ही पद्धत आहे) आणि त्यांनी सरांना छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्टं सांगा अशी विनंती केली.
सरांनी अगदी दोन क्षण त्याचा कडे बघितलं आणि म्हटले ‘चला याच गाण्याचं गोष्टी रुपात निरुपण करतो’ ( verbatim थोडा इथे तिथे झाला तरी आशय पक्का आहे) आणि एकदम जो काही माहोल energy ने भरून गेला.
विचार करा, खडकवासला धरणाच्या काठावर एका मांडवात १००-१५० पोरं आणि समोर धर्माधिकारी सर फुल energy नी ‘ शिवप्रभुंची नजर फिरे अन उठे मुलुख सारा’ या ओळींचं निरुपण करत आहेत! समर्थ रामदासांनी विचारलेला प्रश्न – जगी सर्व सुखी असा कोण आहे याचं उत्तर त्या दिवशी आम्ही preparatory batch ची पोरं असं द्यावसं वाटलं.
असो, सांगण्याचा मतितार्थ असा की तुम्हाला चांगले गुरु लाभणं ह्याला तुमचं पूर्वसुकृत लागतं. हे माझं भाग्य की मला ते लाभले ते तुम्हालाही लाभो अशी सर्वकाळ सर्व शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो!
– Editor,
Bharat Bhagya Vidhata
Categories: Articles, Editorials