Guest Writers

दिवस पहिला – अभ्यंग स्नान

Reading Time: < 1 minute

ऐन दिवाळीत एकट्याने गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला. साहजिकच, कुटुंबियांकडून तिखट बोल ऐकावे लागले. पण, एकांताची आवड आणि काहीशी “craze” त्यांना माहिती असल्याने, मला परवानगी मिळाली. अखेर, २७ ऑक्टोबर २०१९ ला सकाळी ४ वाजता उठून (उठवून) माझी लगबग चालू झाली.

दिवाळीला भटकायला जायची टूम काढली असल्याने पहिली परीक्षा पहिल्याच सकाळी माझी वाट पाहत होती. ‘स्वतःला उटणे लावणे’ आणि ‘५ वाजायच्या आधी घर सोडणे’. स्वतःला उटणे लावण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. सुशेगात बसून उटणे लावण्याची मुभा या अनुभवात नसते. पण, नाविन्याचा आणि स्वावलंबनाचा छोटासा आनंद नक्कीच होता. याशिवाय, आई असल्यावर पाणी उकळवायची गरज नसते, कारण त्याची खात्री आई घेते. इथे मातोश्री नसल्याने, थंडगार पाण्याने अभ्यंग स्नान करण्याची वेळ आली. स्वावलंबी बनत असताना, जवळच्या माणसांची आपल्याला असलेली “सवय” जाणवल्यावाचून राहत नाही. असो.

आदल्या दिवशी शनिवार असल्याने, दाढीचं भिजत घोंगड पडलं होतं. या सगळ्या लगबगीत ४ मिनिटात स्वच्छ दाढी करण्याचा अनुभव सुद्धा तितकाच उत्साहवर्धक होता. या सगळ्या गोंधळात ५ वाजता सुटणारी लोकल बरोबर ५.०५ ला निघाली. झालेल्या विलंबामुळे, ट्रेनमध्ये चढण्याचे स्थानक “मुंबई सेंट्रल” वरून “दादर”ला सोयीने सरकले.

अरे देवा, दादर आलेही. त्याची आठवण करायला दादा नाही आहे. तात्पुरता निरोप घेतो. पुढील हितगुज होईपर्यंत, शुभ दीपावली!

– आदित्य खरे, शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई

Categories: Guest Writers

Leave a Reply